*माझे काय चुकले?*
मी *डाॅ. समीर रज्जाक तांबोळी.* वैद्यकिय अधिकारी, म्हसवड. गाव गोंदवले बुद्रुक. सलग तीन पिढ्या डाॅक्टर असल्याने रुग्णसेवेचे बाळकडू आपोआप मिळालेले. प्रसिद्ध दमातज्ञ अशी ख्याती असलेले व हजारो रुग्णांना दम्यापासून मुक्तता देणारे डाॅ. चंदुलाल तांबोळी व आदर्श तालुका आरोग्य अधिकारी व माणदेश रत्न पासून शतायुषी पर्यंत अनेक पुरस्कार मिळवलेल्या डाॅ. रज्जाक चंदुलाल तांबोळी यांचा मी वारस.
लहानपणा पासून पहिल्या नंबरने राहून बारावीत 94% मार्क्स मिळवून रात्रंदिवस अभ्यास करुन एम् बी बी एस् पूर्ण केले. शहराकडे जाणारी सर्व सुखे खुणावत असताना देखील पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून खेड्याकडे वळणे पसंत केले. वडिलांप्रमाणेच शासकिय अधिकारी होऊन सेवा करायचे ठरवले. लहानपणापासूनच माणदेशाची प्रचंड ओढ होती. परंतु नाईलाजाने पाटण तालुक्यातून सेवेची सुरुवात करावी लागली. माण तालुक्यात यायला पाच वर्षे गेली. प्राथमिक आरोग्य केंद्र, पळशी व मार्डी येथे सेवा केली. प्रामाणिक व मनापासून काम करत असल्याने हळूहळू लोकांशी नाती जडत गेली, लौकीक होत गेला.
दरम्यान म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची घडी खूपच विस्कळीत झाली होती व येथे वर्ष दीडवर्षात दहा ते बारा वैद्यकिय अधिकारी होऊन गेलेले. जिल्ह्यातील *71 प्रा.आ.केंद्रात म्हसवडचा नंबर 69 वा होता.* अवघ्या 20 ते 25 प्रसुती वर्षाकाठी व्हायच्या. म्हसवड चे वैद्यकिय अधिकारी पद म्हणजे साक्षात काळ्या पाणी शिक्षा हिच भावना आम्हा वैद्यकिय अधिकार्यांमधे होती. कामाची उद्दिष्टे पूर्ण न केल्यास म्हसवडला पाठवले जाईल असा सज्जड दम वरिष्ठ अधिकारी देत असत व त्या धास्तीनेच आम्ही वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी काम वेळेत पूर्ण करायचा प्रयत्न करत असू.
अशा ठिकाणी नियुक्ती घेणेस काहीसा नाखूष असलो तरी हे आव्हान स्वीकारायचेच असा चंग बाधून कामाला सुरुवात केली. मागच्या तीन वर्षात म्हसवड प्रा.आ.केंद्रावरील असणारे सर्व कलंक पुसून टाकण्यास यश मिळाले. रोजच्या पेशंटची संख्या *शंभरी* गाठू लागली. वर्षाकाठी ज्या 20 ते 25 प्रसुती होत होत्या तो आकडा *पावणेतीनशे* च्या घरात गेला. सर्व कर्मचारी वर्ग सतर्क असल्याने एकाही गावात कसल्याही साथीची लागण झाली नाही. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची उद्दिष्टे वेळेआधी पूर्ण होऊ लागलीच पण राष्ट्रीय कार्यक्रम नसताना देखील कॅन्सरसारख्या असाध्य आजारावरच्या तपासण्या व शिबिरे येथे होऊ लागली व अनेक माता भगिनींना जीवनदान मिळाले. हा *म्हसवड पॅटर्न* आज माण पॅटर्न म्हणून संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाऊ लागला. जिल्ह्याच्या कानाकोपर्यात राबवण्यात येणार्या कॅन्सर तपासणी शिबिरामधे टीम म्हसवड ला बोलवण्यात येऊ लागले. बघता बघता काम एवढे वाढले की प्रा.आ.केंद्र, म्हसवड *आयएस्ओ* झाले. हजारो रुग्ण लाभ घेऊ लागले. प्रा.आ.केंद्राच्या रॅंकिग मधे सुधारणा होत गेली आणि *सातारा जिल्ह्यामधे 69 व्या क्रमांकावर असलेले प्रा.आ.केंद्र, म्हसवड हे आज सातारा जिल्ह्यातील रॅंकिंग मध्ये प्रथम क्रमांकाचे केंद्र बनले.* म्हसवड प्रा.आ.केंद्राचा अभिमान असणार्या 108 अॅम्ब्युलन्स ची चाके अखंड फिरु लागली व अल्पावधीतच जिल्ह्यामधे या सेवेने देखील प्रथम क्रमांक मिळवला. आणि गत महिन्यात सर्वोच्च बहुमान मिळवताना या म्हसवड प्रा.आ.केंद्राने संपूर्ण महाराष्ट्रातून हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच घोषित करण्यात आलेल्या *फाइव्ह स्टार* केंद्रामधे नाव मिळवले. सातारा *जिल्ह्यातील हे एकमेव फाइव्ह स्टार प्राथमिक आरोग्य केंद्र.*
पण आज मी व्यथित आहे. माझ्या प्रा.आ.केंद्रावर झालेला अकारण हल्ला हा माझ्या काळजावर घाव करुन गेला. 24 तास मुख्यालयी राहत असून मी केवळ दहा ते पंधरा मिनिटांसाठी पेट्रोल पंपावर गेलो असता अतिशय लाजीरवाण्या व किळसवाण्या भाषेत माझा काहीही गुन्हा नसताना शिवीगाळ करण्यात आली. कोणताही रुग्ण सोबत नसताना केवळ बुलेटवरुन आलेल्या दोघांनी प्रा.आ.केंद्रातील साहित्याची प्रचंड नासधूस केली. युपी व बिहार मध्ये सुद्धा कितीही मोठे दंगे झाले तरी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणार्या जीवनदायिनी फोडल्याचे कधी ऐकिवात नव्हते ते माणदेशात घडले व माझी *108 क्रमांकाची रुग्णवाहिका* फोडण्यात आली. कधीही कुणाला न दुखवणार्या व गोरगरीब रुग्णांशी माझ्यापेक्षाही काकणभर अधिक जवळीक असणार्या माझी डाॅक्टर पत्नी सौ. समीना हिला अतिशय हीन भाषेत अरे तुरे करुन शिवीगाळ करण्याची मर्दुमकी गाजविण्यात आली. *तुमचा कोण पेशंट आहे काय त्रास आहे आपण तपासून पाहू* असं म्हणत असताना देखील माझ्या *लहान मुलांसमोर* तिला शिवीगाळ करण्यात आली. *रात्रभर मुले भेदरलेल्या अवस्थेत होती.* माझा सर्व 24 तास मुख्यायली राहणारा स्टाफ प्रचंड दहशतीखाली होता. असे असताना देखील या सर्वांवर कडी करत एका वृत्तपत्राने *प्रत्यक्ष डाॅक्टरांना शिवीगाळ होऊनही* डाॅक्टर गैरहजर असल्याने प्रा.आ.केंद्राची मोडतोड अशी धादांत खोटी हेडलाइन देऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील विश्वास डळमळीत केला.
आज मनस्थिती उद्विग्न आहे. समाजातील ज्या वर्गासाठी आम्ही काम करतो तो गरीब रुग्णांच्या वर्गामधे अन्यायाविरुद्ध एकवटण्याची व आमच्या बाजूने उभे राहण्याइतकी ताकद नाही हे दुर्दैव मोठे असल्याची जाण मला आहे. आज या ठिकाणी काम करण्याची मानसिकता राहीली नाही. वादळ येऊन गेले असले तरी त्याच्या खुणा लवकर पुसल्या जातील असे वाटत नाही. माण तालुक्यापर्यंत हे लोण यावे याचेही दु:ख मोठे आहे. मनात साचलेले दु:ख कोणत्या तरी रितीने बाहेर यावे यासाठीच हा शब्दप्रपंच. घाव जरी भरुन आले तरी व्रण बराच काळ राहतील आणि एकच प्रश्न ह्रदयावर दस्तक देत राहील की माझे काय चुकले?
*या घटनेनंतर म्हसवड शहरातील मान्यवर माझे जवळपास सर्वच पत्रकार बंधू नागरिक यांनी प्रत्यक्ष भेटून या घटनेचा निषेध करुन प्रा आ केंद्रास पाठिंबा व्यक्त केला. तालुक्यातील जवळजवळ सर्वच वरिष्ठ अधिकारी यांनी आस्थेने विचारपूस केली व मनोबळ वाढवले. याचबरोबर अखिल भारतीय कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकिय अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य नर्सेस संघना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना यांनी तातडीने या घटनेची माहिती घेऊन असंख्य कर्मचारी अधिकारी यांचे पाठबळ उभे केले. या सर्वांचा मी शतश: ऋणी राहीन.*
*डाॅ. समीर तांबोळी*
मेडिकल आॅफिसर, म्हसवड.
मोबा. 09423828834, 09403684889
No comments:
Post a Comment