Wednesday, 26 July 2017

पेट्रोल गुणवत्ता व अॉक्टेन क्रमांक

**** कुतूहल  ****

*पेट्रोलचा ऑक्टेन क्रमांक*
(काॅपी-पेस्ट, दै लोकसत्ता)

पेट्रोल या इंधनावर धावणारी वाहने ‘स्पार्क इग्निशन’ तत्त्वावर कार्यरत होतात. द्रवइंधनाचे वायूत रूपांतर होते. या वायूला इंजिनाद्वारे एक ठिणगी मिळाली की, तो वायू छोटेछोटे स्फोट होऊन जळतो आणि इंजिन सुरू होते. हे जे छोटे स्फोट होतात, त्याला ‘नॉकिंग’ म्हणतात. इंजिनातील सिलेंडरमध्ये इंधन जळू लागले की इंजिन हादरते व आवाज येतो. या ‘नॉकिंग’मुळे इंजिनाचे भाग खराब होऊ शकतात. त्याला आवर घालणे गरजेचे असते. पेट्रोलची ही नॉकिंग क्षमता ‘ऑक्टेन क्रमांक’ देऊन मोजली जाते. जेवढा हा क्रमांक मोठा, तेवढी इंधनाची गुणवत्ता चांगली आणि इंजिनाची सुरक्षितता जास्त. ऑक्टेन क्रमांक मोजण्यासाठी ‘कोऑपरेटिव्ह फ्युएल रिसर्च’ (सी.एफ.आर.) हे इंजिन वापरतात.

आयझोऑक्टेन या रासायनिक द्रावणाचा ऑक्टेन क्रमांक १०० समजला जातो, तर नॉर्मल हेप्टेन या दुसऱ्याद्रावणाचा हा क्रमांक शून्य धरला जातो. या दोन रसायनांचे मिश्रण बनवून त्यांच्या नॉकिंग क्षमतेशी इंधनांशी तुलना केली जाते व त्या मिश्रणातील आयझोऑक्टेनचे प्रमाण हा त्या इंधनाचा ऑक्टेन नंबर मानला जातो. उदा. आपल्याकडे ९१ आणि ९७ ऑक्टेन क्रमाकांची पेट्रोल इंधने सर्रासपणे वापरली जातात; म्हणजेच ९१ टक्के व ९७ टक्के आयझोऑक्टेन रसायनाचे नॉर्मल हेप्टेनसोबत होणाऱ्या मिश्रणाइतकीच या इंधंनांची अनुक्रमे नॉकिंग क्षमता असते.

पेट्रोलमध्ये अन्य स्वस्त इंधने नि द्रावणे यांची भेसळ झाली तर त्याचा ऑक्टेन क्रमांक कमी होतो व त्याची कार्यक्षमता कमी होते.

पूर्वी ऑक्टेन क्रमांक वाढीव असावा म्हणून त्यात अल्पप्रमाणात शिसेयुक्त (टेट्राइथाईल लेडसारखी) रसायने वापरली जात. पण इंधन जळताना शिशाची संयुगे वायुरूपातून हवेचे प्रदूषण करतात, असे आढळल्याने, जगभर सुमारे ८० वर्षे वापरत असलेल्या या रसायनावर बंदी आली आणि अनलेडेड पेट्रोल (यू.एल.पी.) उदयास आले.

पुढे ऑक्टेन बूस्टर म्हणून मिथाईल-टर्शरीब्युटाईल-ईथरसारखी सेंद्रिय रसायने वापरली जाऊ लागली;  परंतु त्यातूनही कर्कप्रेरकी रसायने उत्सर्जित होत असल्याचे आढळले.

आता, पेट्रोलची निर्मिती करताना त्यातील सरळ शृंखलायुक्त  संयुगाचे चक्रिय शृंखलायुक्त रसायनात रूपांतर करून ऑक्टेन क्रमांक वाढविला जातो. या प्रक्रियेला ‘हायड्रोकार्बन रिफॉर्मिग’ म्हणतात. यात बेंझीनसारख्या कर्कप्रेरकी चक्रीय सेंद्रिय रसायनाचे इंधनात अत्यल्प प्रमाण राहील; याची दक्षता घ्यावी लागते. बेंझीनचे प्रमाण मोजण्यासाठी गॅस क्रोमेटोग्राफसारखे उपकरण वापरतात.

– जोसेफ तुस्कानो
*मराठी विज्ञान परिषद*
➖➖➖➖➖➖
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !
🌹 *जय विज्ञान*🌹
संकलक - *नितीन खंडाळे*
                  चाळीसगाव
➖➖➖➖➖➖
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#माझीशाळामाझीभाषा*

No comments:

Post a Comment