Saturday, 15 July 2017

शिआबाओ

चीनचा लोकशाहीवादी लढवय्या  लू श्याबाओ !
----------------------------------------------------
चीनच्या पोलादी भिंतीला लोकशाहीच्या मागणीसाठी,लोकशाहीच्याच मार्गाने अखंड धडका मारणारा आणि आणि तिआनमेन चौकात थेट माओच्या रणगाड्यांना भिडणारा लू श्याबाओ अखेर वयाच्या ६१ व्या वर्षी विकोपाला गेलेल्या कॅन्सरने तुरुंगाच्या गजाआडच काल मरण पावला.

२०१० सालातील शांततेचे नोबेल प्राईझ मिळवणारा हा चीनमधील लोकशाहीवादी नेता आयुष्याची १६ वर्षे तुरुंगातच होता. त्याला, त्याच्या पत्नीला वा कोणाही चिनी नागरिकाला त्याच्या वतीने हा नोबेल पुरस्कार कम्युनिस्ट सरकारने स्वीकारू दिला नाही.

वयाच्या २२ व्य वर्षी  चिनी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात दाखल झालेल्या या तरुणाने 'Innocent Heart' हा कविताप्रेमींचा गट नावारूपाला आणला.'कन्फ्यूशिअस' या चीनच्या परंपरागत तत्वज्ञानालाही तो आव्हान देऊ लागला.खुलेआम विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य  मागू लागला.लिखाणाच्या शैलीने आणि ओजस्वी वक्तृत्वाने देश विदेश गाजवू लागला.वयाच्या पंचविशीतच तो युरोप,अमेरिकेतील नामवंत विद्यापीठात व्याख्याने देण्यासाठी जाऊ लागला. सरकारच्या निर्बंधांमुळे विदेशातच राहून तो चीनमधील विद्यार्थ्यांना व तरुणांना जागे करू लागला.

२७ एप्रिल,१९८९. चीनमधील हजारो तरुण लोकशाहीच्या मागणीसाठी तिआनमेन चौकात एकत्र जमले आणि या लढ्यासाठी लू जीवावर उदार होऊन चीनमध्ये परत आला.सरकारने या विद्यार्थ्यांवर शस्त्र चालवू नये म्हणून तो त्याच्या ३ साथीदारांना घेऊन थेट रणगाड्यांच्या पुढेच तीन दिवस उपोषण करीत बसून राहिला आणि मग बघता बघता या आंदोलन करणाऱ्या विद्यर्थ्यांचा 'हिरो' बनला.समाजाच्या एका वर्गाला कायमच शत्रू म्हणून बघण्याचे मार्क्स,लेनिन आणि माओचे तत्वज्ञान चिनी सरकारने कायमचे फेकून द्यावे आणि संवाद, सामोपचार,सहभागाचे धोरण स्वीकारावे असे जीव तोडून त्या रणगाड्यांच्या पुढे उभा राहून तो सांगू लागला.सरकारचा एकूण नूर पाहून त्याने अखेरीस त्या हजारो विद्यर्थ्यांना चौक सोडायला राजी केले आणि बराच मोठा रक्तपात टाळला. 'चार सभ्य माणसे' या पदवीने त्याला व त्याच्या साथीदारांना  विद्यार्थ्यांनी गौरवले तर 'भुंकणारा कुत्रा' ही पदवी त्याला सरकारी वर्तमानपत्रांनी दिली.

लोकशाहीच्या मागणीसाठी झालेले हे मोठे पण अयशस्वी आंदोलन हा लूच्या जीवनाला कलाटणी देणारा टप्पा ठरला.तो कम्युनिस्ट सरकारचा शत्रू ठरला आणि तिथेच सुरु झाली ती एक प्रचंड ताकदवान सरकार आणि तेव्हढ्याच मानसिक ताकदीच्या प्रतिभावान व्यक्तीची लढाई. घरावर पहारे,स्थानबद्धता, नातेवाईकांचा छळ,वाचन वा लिखाणावर बंदी,देशद्रोहाची आरोपपत्रे,कोर्टात  बचावाचे निवेदन करण्यासही बंदी असा हा जीवघेणा संघर्ष सतत २७ वर्षे चालू राहिला आणि अखेरीस संपला तो त्याच्या तुरुंगातील मृत्यूनेच !

त्याच्या ढासळत्या प्रकृतीच्या बातम्या कम्युनिस्टांनी दडपल्याच आणि चायना मेडिकल हॉस्पिटलला त्याला उपचारांसाठी दाखल केले ते, तो आता नक्की मरणार याची खात्री झाल्यावरच.जगातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी लू वर उपचार करण्याची,त्यासाठी चीनला येण्याची तयारी दाखवली होती पण सरकारने त्याच्या प्रकृतीविषयी बातम्या द्यायलाही हॉस्पिटलला बंदी केली होती.

२००८ साली त्याने चीनच्या लोकशाहीचा आठ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून मोठी खळबळ उडवली.व्यक्तिस्वातंत्र्य,अनेक पक्षीय लोकशाही,कम्युनिस्ट विचारप्रणालीचा विरोध या साठी त्याने शेकडो कविता,लेख आणि पत्रे  तैवान, हॉंगकॉंग येथून प्रकाशित केले.ते जगभर पोहचले.त्याला तुरुंगातून सोडावे म्हणून  सलमान रश्दींसारख्या जगातील अनेक नामवंतांनी कायम प्रयत्न केले.

'I have no enemies,no hatred' हे त्याचे पात्र हा निर्भय मनाचा,लोकशाही प्रेमाचा आणि उदार अंतःकरणाचा पुरावा आहे.नोबेल पारितोषिक वितरणाच्या समारंभात या पत्राचे जाहीर वाचन करून लूच्या सन्मानार्थ व्यासपीठावर मांडलेल्या एका रिकाम्या खुर्चीवर त्याचे पारितोषिक ठेवले गेले.

"कम्युनिस्टांच्या विळख्यात सापडलेल्या या देशावर पश्चिमेतल्या एखाद्या देशाने किमान ३०० वर्षे राज्य केले तरच तेथे लोकशाही आणि समतेचे युग येईल" असे तो उपहासाने म्हणत असे.

राजरोस हिंसा करणाऱ्या काश्मीर वा अन्य भागातील अतिरेक्यांचा कैवार घेऊन रोज निदर्शने करणाऱ्या भारतातील लालभाईंना आणि त्यांच्या साथीदारांना लू चे नांव ओठावर आणणे देखील गुन्हा वाटतो. त्याची पाठराखण तर सोडाच पण पण त्याच्याविषयी मौन बाळगण्यातच भारतातल्या मानवाधिकाऱ्यांनी धन्यता मानली.

नक्षलवाद्यांना उघड उघड समर्थन देत त्यांच्या सशस्त्र लढ्याला सहानुभूती दाखवणारे,त्यांच्याशी गुप्त पत्रव्यवहार केल्याचा आरोप असणारे प्रा.साईबाबा,अरुंधती रॉय,विनायक सेन हे आमच्या साम्यवाद्यांचे आणि समाजवाद्यांचे 'हिरो' तर चीनमध्ये अहिंसक मार्गाने लोकशाहीसाठी,व्यक्तीच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी  मरेपर्यंत आवाज उठवणारा लू श्याबाओ मात्र त्यांचा कट्टर शत्रू !

लू श्य्यीया या आपल्या प्रिय पत्नीला लू आपल्या सामर्थ्याचा सर्वोच्च स्रोत मानायचा.तीच त्याची एकमेव प्रेरणास्थान होती.सरकारचा प्रचंड छळ सोशीत ही कवियत्री कायम लू च्या सोबत राहिली.त्याला तुरंगाबाहेरील जगाशी जोडणारी एकमेव दूत बनली.तिच्याविषयी लू आपल्या एका कवितेत लिहितो,    
The glitter of the outside world
scares me
exhausts me
I focus on
your darkness –
simple and impenetrable...

चीन मध्ये कधी लोकशाही अवतरलीच तर त्या प्रसिद्ध तिआनमेन चौकात पिढ्या पिढ्यांना प्रेरणा देणारा ज्याचा पुतळा उभा राहील असा हा आपला शेजारी लू श्याबाओ आणि असा हा त्याचा संघर्ष !

"एखादा गांधी आमच्या चीनमध्येही जन्माला यावा.." असे म्हणणाऱ्या या निर्भय वीराला श्रद्धांजली !

डॉ. जयंत कुलकर्णी

No comments:

Post a Comment