Tuesday, 11 July 2017

नायटा

नायटा – एक राष्ट्रीय समस्या

              नमस्कार मित्रांनो . मी डॉ.किरण वासुदेव नाबर. मी गेली ३० वर्षे त्वचारोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे.
               गेल्या ५-६ वर्षापासून आम्हा त्वचारोगतज्ञाच्या दवाखान्यात नायटयाच्या रुग्णांची भरमसाठ वाढ झाली आहे. पूर्वी १०० रुग्णांमध्ये नायटयाच्या रुग्णांचे प्रमाण जेमतेम ५-६ असायचे . ते सध्या जवळ जवळ २५ -३० एवढे आहे . गेल्या वर्षभरात तर या रोगाने साथीचे स्वरूप धारण केले आहे . पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला व्हायचा . हल्ली तर कुटुंबच्या कुटुंब या आजाराने त्रस्त आहेत . पूर्वी हा आजार साध्या व स्वस्त बुरशी विरोधक गोळ्यांनी बरा व्हायचा व योग्य काळजी घेतल्यास बरेच दिवस परत होतही नसे . हल्ली या रोगासाठी उच्चतम प्रतीची व अर्थात महाग बुरशी विरोधक औषधे वापरावी लागत आहेत . तरीही हा आजार बरा होऊनही लगेच परत येत आहे .
          या आजाराने असे जे साथीचे रूप धारण केले आहे , त्याचे मुख्य कारण म्हणजे स्टीरॉइड मलमांचा गैरवापर हे आहे .
            नायटा हा बुरशीजन्य आजार आहे व त्यासाठी फक्त बुरशी विरोधक मलमे व बुरशी विरोधक पोटातून घेण्याची औषधे यांचा वापर करणे आवश्यक असते . परंतु सामान्य नागरिक जांघेत किंवा पोटावर खाज येते म्हणून पुष्कळदा केमिस्टकडे जाऊन मलम मागतो . केमिस्ट नेहमी  स्टीरॉइड + बुरशी विरोधक + जीवाणू विरोधक ( Steroid + Antifungal + Antibacterial ) असे सर्व गोष्टी एकत्र असणारे  मिश्र मलम अशा व्यक्तीला देतो . उदा - Candid-B , Zole-F, Nadimix , Quadriderm , Dermi 5 , Panderm Super , O2 Derm , Fourderm , Lobate GM , Cosvate GM , Castor NF , Clobinet GM , Surfaz SN , TAF-AF , Tenovate ,Qualiderm  इ.इ . मलमे लावली की पेशंटला सुरवातीला लगेच बरे वाटते . कारण स्टीरॉइडमुळे खाज व लाली लवकर कमी होते . पण स्टीरॉइड हे त्वचेवर जिथे लावले जाते त्या भागाची प्रतिकार शक्तीही कमी करते , त्यामुळे आतल्या आत बुरशी मात्र वाढत असते . मलम बंद केले की दुप्पट वेगाने तो आजार वाढतो . नंतर नंतर तर अशा मलमाचा फायदा तर काहीच होत नाही, पण दुष्परिणाम मात्र दिसायला लागतात .  जांघेतील  त्वचा पातळ व नाजूक बनते . जांघेत , मांडीवर व पोटावर स्ट्रेच मार्क दिसू लागतात . त्वचेखाली रक्त जमा होते . त्वचेवर जखमा होतात . चेहऱ्यावर जर अशी मलमे बराच कालावधीसाठी लावली गेली तर चेहऱ्यावर मुरमे येणे , चेहऱ्याची त्वचा लाल व हळवी बनणे , स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस उगवणे असे दुष्परिणाम दिसू लागतात .
हल्ली बहुतेक स्टीरॉइड संमिश्र मलमांमध्ये CLOBETASOL PROPIONATE  हे अतितीव्र स्टीरॉइड असते . त्यामुळे  स्टीरॉइडचे दुष्परिणाम फारच जास्त प्रमाणात आढळून येतात .             अशा प्रकारच्या  मिश्र मलमांना परवानगी देऊ नये यासाठी सरकारकडे आमच्या संघटनेने पाठपुरावा केला आहे , पण त्याचा अद्यापही काही उपयोग झालेला नाही . औषध कंपन्यांची  जनतेच्या स्वास्थाशी बांधिलकी असली पाहिजे . पण त्याही स्वतःच्या फायद्यासाठी अशी अतार्किक स्टीरॉइड मिश्र मलमे ( Irrational Steroid Combination Creams ) बाजारात आणतात . सरकारही यावर काही कारवाई करत नाही .             ही साथ जर आटोक्यात आणायची असेल तर आता जनतेनी  , केमिस्टनी  व डॉक्टरानीच प्रयत्न केले पाहिजेत .

जनतेने खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे

१) कपडे सुती व ढगळ (लूज ) वापरणे .
२) रात्री underwear  काढून बर्मुडा किंवा ढिली चड्डी वापरणे .
३) पावसामध्ये भिजू नये , भिजल्यास लवकर कपडे बदलावेत ( लक्षात ठेवावे की पाव ओलसर असल्यास त्याला बुरशी येते , टोस्टला बुरशी येत नाही )
४) पावसाळ्यात आजचे कपडे उद्या सुकत नाहीत त्यामुळे जास्त कपडे ठेवावेत .
५) अधी मधी underwear  ला इस्त्री मारावी .
६) वजन जास्त असल्यास मांडीला मांडी घासते व घाम अडकून हा आजार वाढतो . त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवावे .
७) रोज सकाळी व जमल्यास दुपारी , संध्याकाळी जांघेत, सीटवर व पोटावर antifungal  पावडर लावावी जेणेकरून कोरडेपणा राहील .
८) थेट केमिस्ट कडून औषधे घेणे टाळावे . केमिस्टनेही अशा रुग्णांना मलमे देणे टाळावे . जास्तच आग्रह झाल्यास फक्त बुरशी विरोधक ( Clotrimazole , Miconazole ) असलेले उदा . Candid , Zole , Canesten , Dk gel , Daktarin gel इ . यातील एखादे मलम देणे .
९) स्वतःच्या त्वचेवर प्रयोग न करता रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जांघेतील किंवा इतर खाजेवर औषधोपचार करावा .

          आमच्या असे निदर्शनास आले आहे की डॉक्टरही पुष्कळदा नायटयासाठी स्टीरॉइड असलेली मिश्र मलमे रुग्णांना लावायला देतात . नायटा हा ओळखण्यास फारसा कठीण नसतो . जांघेत , सीटवर , पोटावर , कमरेला , काखेत , चेहऱ्यावर जर गोलाकार खाज येणारे चट्टे असतील तर ते नायटा असण्याची शक्यता दाट असते . अशावेळी डॉक्टरांनी फक्त आणि फक्त बुरशी विरोधक ( Clotrimazole , Miconazole , Luliconazole, Eberconazole,sertaconazole ) मलमे रुग्णांना द्यावी . तोंडावाटेही फक्त बुरशी विरोधक औषधेच द्यावीत . ही औषधे कमीत कमी एक दीड महिना चालू ठेवावीत . कधीही  स्टीरॉइड असलेली मिश्र मलमे व तोंडावाटे स्टीरॉइडच्या गोळ्या नायटयासाठी देऊ नयेत . नायटयावर अदयाप तरी इंजेक्शन उपलब्ध नाही .
        स्टीरॉइडच्या अतिरेकी गैरवापरामुळे या नायटयाच्या रोगाने भारतभर थैमान घातले आहे . नागरिकांनी , केमिस्टनी व डॉक्टरांनी याबाबत जागरूकता दाखवली व प्रत्येकजण जबाबदारीने वागले तर ही साथ आटोक्यात येणे शक्य आहे .
             एक लक्षात घ्या की आम्ही डॉक्टर्स स्टीरॉइड मलमाच्या वापरास विरोध करत नाही . स्टीरॉइड हे एक उपयुक्त औषध आहे . पण त्याचा योग्य आजारांसाठी व डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर होणे जरुरीचे  आहे . स्टीरॉइड मलमांचा गैरवापर झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात .
         माझी आपणास नम्र विनंती आहे की , आपण माझे हे निवेदन समाज माध्यमांमार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावे . हे करून आपण ही साथ आटोक्यात आणण्यासाठी हातभार लावू शकता .

             डॉ . किरण  नाबर
                     त्वचारोगतज्ञ
                       9.07.2017
              kirannabar@gmail.com

1 comment:

  1. डॉक्टर आपला पत्ता काय आहे
    कुठे आहे तुमचं हॉस्पिटल

    ReplyDelete