Wednesday, 13 September 2017

प्रश्नाविचारण्याचा हक्क आणि महत्व

*“वर ताऱ्यांकडे पाहा, आपल्याच पावलांकडे पाहू नका...”*
स्टीफन हॉकिंग म्हणालेले. आज जगातील सर्वात महत्त्वाच्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत प्राध्यापक स्टीफन हॉकिंग. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि त्यातून निर्माण झालेल्या शक्यता सिद्ध करण्यात स्टीफन हॉकिंगचे योगदान आहे. रॉजर पेनरोज या गणिती वैज्ञानिकासमवेत काम करून कृष्णविवरांचे अस्तित्व त्यांनी सैद्धांतिक मांडणीतून दाखवले आणि त्यातून एक प्रकारचा किरणोत्सार होईल, असेही मांडले; जे नंतर प्रत्यक्ष सिद्ध करण्यात आले.
स्टीफन हॉकिंग यांनी अवकाशविज्ञानासंबंधी एक पुस्तक लिहिले, ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’. वैज्ञानिक कांदबरी वा मनोरंजन नव्हे, तर सोलीव अवकाशविज्ञान यातून त्यांनी समजावून दिले. विज्ञानशिक्षण घेणाऱ्या कुणाही विद्यार्थ्याला सहज समजेल, असे हे पुस्तक होते. या पुस्तकाने विज्ञानविषयक पुस्तकांच्या विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढले.
धर्म आणि देवविषयक कल्पनांच्या बालिश खेळात, श्रद्धांच्या गुंतवळात अडकलेल्या जगासाठी खरे तर प्रा. हॉकिंग हे एक फार मोठे डोळे उघडायला लावणारे उदाहरण आहेत. वयाच्या एकविसाव्या वर्षापासून त्यांना एक भयंकर व्याधी जडली. मज्जासंस्थेवर परिणाम करणारी ही व्याधी असाध्य होती. त्यांचे आयुष्य केवळ काही वर्षांचे असेल, अशी डॉक्टरांची कल्पना होती; जी अर्थातच चूक ठरली.
प्रा. हॉकिंग यांनी अकरा वर्षांपूर्वी एक प्रश्न जगापुढे टाकलेला.
*“या जगात राजकारण, समाज आणि पर्यावरण या तिन्ही आघाड्यांवर इतका प्रचंड गोंधळ आहे, तो पाहता मानवजात पुढली शंभर वर्षे तरी तग धरू शकेल का?” आणि मग ते पुढे म्हणालेले, “मला याचं उत्तर माहीत नाही. पण मी प्रश्न उपस्थित करतो आहे, कारण लोकांच्या मनात हा प्रश्न जागला पाहिजे आणि त्यांनी आपल्यापुढल्या धोक्यांबाबत सावध राहिले पाहिजे.”*

प्रा. हॉकिंग हे नास्तिक आहेत. देव आणि धर्म या कशाचीही माणसाला गरज नाही, यावर त्यांची मते ठाम आहेत. मानवाच्या ज्ञानप्रवासात तत्त्वज्ञान मागे पडले असून आता विज्ञानच मानवी जीवनविषयक उत्तरे देईल, असे ते सांगतात. नवीन वैज्ञानिक शोध या विश्वाच्या पसाऱ्यात आपले स्थान काय, यांसारख्या आध्यात्मिक भासणाऱ्या प्रश्नांचीही उत्तरे देतील, असा त्यांना डोळस विश्वास आहे. काही वर्षांपूर्वी देवाच्या अस्तित्वावर प्रा. हॉकिंग यांचा विश्वास आहे, अशी हाकाटी नास्तिक्यविरोधी ख्रिस्ती परिवाराने सुरू केली.
*तेव्हा प्रा. हॉकिंग यांनी उत्तर दिले होते - “लोक मला विचारतात हे विश्व देवाने निर्माण केले का, तेव्हा मी सांगतो, की हा प्रश्नच अर्थहीन आहे. जेव्हा बिग बँग (महास्फोट) झाला, तेव्हा काळच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे देवाकडे ‘वेळ’च नव्हता विश्व निर्मितीसाठी! पृथ्वीच्या काठापर्यंत कसं पोहोचायचं, हे विचारण्या सारखंच आहे हे पृथ्वी हा गोल आहे. त्याला कड नाही, काठ नाही, त्यामुळे तो शोधत फिरणं निष्फळ आहे.*
*ज्याला ज्यावर विश्वास ठेवायचा असेल त्यावर ठेवायला जो तो मोकळा आहे. पण अगदी साध्या शब्दात स्पष्टीकरण द्यायचं,*
*तर मी सांगेन- देव नाही. या विश्वाची निर्मिती कुणी केली नाही आणि आपली नियती कुणीही ठरवत नाही. यामुळे मला तरी फार गंभीर असे आकलन झाले आहे. कुठेही स्वर्ग नाही, मृत्यूपश्चात जीवन नाही. आपल्याला हे विश्व समजून घेण्यासाठी केवळ हे एकच जीवन लाभले आहे- आणि त्यासाठी मी कृतज्ञ आहे.”*
विचारांच्या स्फटिकशुद्धतेचे आणि धैर्याचे निदर्शक आहेत हे उद‌्गार... पोप जॉन पॉल यांनी जगातील सर्व थोर वैज्ञानिकांना व्हॅटिकनला बोलावले होते, तेव्हाच्या प्रसंगी प्रा. हॉकिंग म्हणाले,
*“जोवर विज्ञान पुढे गेले नव्हते, तोवर देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे समजून घेण्यासारखे होते. आता विज्ञानातून आपल्याला अधिक समर्थ स्पष्टीकरण मिळते. ‘मग आपल्याला देवाचे मन कळेल’ असे मी म्हणालो, तेव्हा मला इतकेच सुचवायचे होते, की देवाला जे माहीत असण्याची आपली अपेक्षा असते ते सारे आपल्याला विज्ञानाच्या आधारे समजेलच. देव नाही, हे मीच म्हणतो आहे. मी निरीश्वरवादी आहे.”*
यापूर्वी “मग आपल्याला देवाचं मन कळेल” असे लिहिल्यामुळे त्यांच्या निरीश्वरवादावर प्रश्नचिन्ह लागले होते. ते प्रश्नचिन्ह त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च पोपसमोरच काढून टाकले

No comments:

Post a Comment